रात्रपाळी म्हणजेच नाईट शिफ्ट्स या दिवसा काम करण्यापेक्षा नक्कीच जास्त थकवणाऱ्या असतात यात शंका नाही.
नुकत्याच अमेरिकेतील वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासामध्ये, रात्रपाळी केल्याने आरोग्यावर होणाऱ्या घातक परिणामांबद्दलची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सलग 3 रात्री तुम्ही जागून काम केलं म्हणजेच नाईट शिफ्ट केली तर तुम्हाला असणारा मधुमेहाचा आणि स्थूलपणाचा धोका वाढू शकतो.
नाईट शिफ्टमुळे डायबेटीज आणि ओबॅसिटीचा धोका वाढण्याचा वेग अत्यंत जास्त आणि चिंताजनक असल्याचं संशोधक सांगतात.
आपल्या शरीराच्या दिनचर्येचं एक नैसर्गिक वेळापत्रक असतं ज्याला बॉडी क्लॉक असं म्हणतात. साधारणपणे रात्र आणि दिवस अशा दोन भागात याची विभागणी होते.
नाईट शिफ्टमुळे या बॉडी क्लॉकचं गणित बिघडतं. त्यामुळे अनेक शारीरिक समस्या निर्माण होतात.
जर्नल ऑफ प्रोटीमी रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या या अहवालानुसार, नाईट शिफ्टमुळे शरीरातील प्रोटीन्सचं संतुलन बिघडतं.
प्रोटीनमुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती संतुलित ठेवण्यास तसेच शरीरामधील ग्लुकोजचं प्रमाण नियमित ठेवण्यासाठी मदत होते.
शरीरातील ग्लुकोजसंदर्भातील संतुलन बिघडत असल्याने अनेकदा नाईट शिफ्ट करणाऱ्यांना मधुमेहाचा त्रास होतो किंवा त्याचा धोका वाढतो.
रात्री काम करण्याचा थेट संबंध रक्तदाब वाढण्याशी जोडला जाऊ शकतो असं अनेक अभ्यासांमधून दिसून आलं आहे. यामुळे हृदयासंदर्भातील समस्या आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.
नाईट शिफ्टमधून कर्मचाऱ्यांकडून काम करु घेताना कंपन्यांनी त्यांच्या आरोग्याचा विचार करुन नियमित ब्रेक दिले पाहिजेत.
नाईट शिफ्ट करणाऱ्यांनी आरोग्यवर्धक अन्नपदार्थांना प्राधान्य देण्याबरोबरच झोपेचं योग्य पद्धतीने नियोजन केलं पाहिजे.
नाईट शिफ्टमध्ये काम करत असाल तर सर्वात आधी आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि योग्य आराम या तीन गोष्टी आवर्जून पाळा.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)