भात खाल्ल्याने वजन वाढते हा तर सर्वसामान्य समज आहे. याशिवाय डायबिटीस, थायरॉईड, वजनवाढ, लठ्ठपणा यासारखे आजार असणाऱ्या व्यक्ती भात खाणे टाळतात.
तांदळामध्ये अधिक प्रमाणात कार्बोहायड्रेट असतात. भाताच्या सेवनाने शरीराला उर्जा मिळते. भात हा ग्लुटनफ्री असून यामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि विटामिन बी सारखी अनेक तत्व आढळतात.
भातात सोडियम अत्यंत कमी प्रमाणात असून शरीर हायड्रेट राखण्यास याचा उपयोग होतो. फायबर अधिक प्रमाणात असल्याने पचण्यास हलका असतो आणि जर योग्य पद्धतीने भात शिजविण्यात आला तर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यासही मदत मिळते असे मत आयुर्वेदिक डॉक्टरांनी मांडले आहे.
आयुर्वेदिक पद्धतीने तांदूळ तुम्ही शिजवला तर यातील गुण अधिक फायदेशीर ठरतात.यामध्ये हाच प्रयत्न असतो की, जेवण अशा पद्धतीने शिजवावे ज्यातून पोषक तत्व हे आतड्यांपासून रक्तामध्ये आणि शरीरातील सर्व वाहिन्यांमध्ये व्यवस्थित पोचावे. तसंच पचनक्रिया उत्तम राहावी याच पद्धतीने शिजवण्यावर भर देण्यात येतो.
आयुर्वेदात अन्न भाजण्यावर आणि जास्त पाणी घालून शिजविण्यावर जोर दिला जातो. आयुर्वेदानुसार, अन्न सुके भाजल्याने धान्यातील सर्व विभिन्न स्टार्चची संरचना बदलते. त्यातील काही स्टार्च हे कॅरेमलाईज्ड होते आणि त्यामुळे भाताचा स्वाद वाढतो.
सर्वात आधी तुम्ही नियमित वापरता तो तांदूळ भाजून ठेवावा. जेव्हा भात बनवायचा आहे त्यावेळी तुम्ही 1 भाग तांदूळ आणि त्याच्या 4 पट पाणी घ्यावे. यामध्ये तुम्ही गाईचे 1 चमचा तूप आणि चवीनुसार मीठ मिक्स करावे. त्यानंतर कुकरमध्ये न शिजवता बाहेर पातेलीत हा भात शिजवावा.
तांदूळ व्यवस्थित शिजल्यानंतर उरलेले पाणी गाळून घ्या. या पाण्याचा वापर तुम्ही नुसते पिण्यासाठी करू शकता, शिवाय केसांसाठीही याचा उपयोग करता येतो.