गुजरात टायटन्सप्रमाणेच गेल्या वर्षी आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सने प्रवेश केला होता. त्यावेळी झिम्बाब्वेचे माजी कर्णधार अँडी फ्लॉवर यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलं होतं. यावर्षी देखील फ्लॉवर यांच्याकडे ती जबाबदारी आहे. 2010 मध्ये फ्लॉवर इंग्लंड संघाचे प्रशिक्षक होते, त्यावेळी इंग्लंडने टी20 वर्ल्ड कप जिंकला होता.
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज आशीष नेहरा गुजरात टायटन्सचा मुख्य प्रशिक्षक आहे. आयपीएलमध्ये गुजरातने गेल्या वर्षी पदार्पण केलं आणि पहिल्याच फटक्यात गुजरातने आयपीएलचं जेतेपद पटकावलं. त्यावेळीही आशिष नेहरा गुजरात टायटन्सचा मुख्य प्रशिक्षक होता.
आयपीएल 2023 मध्ये पंजाब किंग्स संघाला ट्रेवर बेलिस प्रशिक्षण देताना दिसणार आहेत. अनिल कुंबळे यांच्या जागी पंजाबने इंग्लंडचे माजी कोच बेलिस यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलं आहे. बेलिस यांनी इंग्लंडला 2019 चा वर्ल्ड कप जिंकून दिला होता. याआधी ते सनरायजर्स हैदराबादचेही प्रशिक्षक होते.
श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कुमार संगकारा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक आहे. 2021 पासून तो ही जबाबदारी सांभाळतोय. संघाचा संचालक आणि मुख्य प्रशिक्षक अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पडतोय.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने 2021 मध्ये संघाचे बॅटिंग प्रशिक्षक संजय बांगर यांना संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलं. संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली आरसीबीने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. पण जेतेपदापासून ते दूरच आहेत. या वर्षी आरसीबी हे दृष्टचक्र मोडेल अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.
क्रिकेट जगतातील सर्वात यशस्वी कर्णधार आणि ऑस्ट्रेलियाला दोन वेळा एकदिवसीय वर्ल्ड कप जिंकून देणारा दिग्गज क्रिकेटपटू रिकी पॉण्टिंगवर दिल्लीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 2018 पासून रिकी पॉण्टिंग दिल्लीच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. पण दिल्लीला अजून एकदाही जेतेपद पटकावता आलेलं नाही.
वेस्टइंडिजचे महान फलंदाज ब्रायन लारा यंदाच्या आयपीएलमध्ये महत्वाची भूमिका बजावतायत. आयपीएल 2023 साठी सनरायजर्स हैदराबादने ब्रायन लारा यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलं आहे. 2021 मध्ये लारा मुख्य सल्लागार म्हणून नियुक्त झाले होते. आता टॉप मुडी यांच्या जागी त्यांना प्रशिक्षकपदी नेमण्यात आलं आहे.
भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये यशस्वी प्रशिक्षक म्हणून ओळखले जाणारे चंद्रकांत पंडीत कोलकाता नाईट रायडर्सचे मुख्य प्रशिक्षक आहेत. पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भाने दोन वेळा रणजी ट्रॉफी पटकावली. त्यानंतर ते मध्यप्रदेशचे प्रशिक्षक बनले आणि मध्यप्रदेशनेही रणजी ट्ऱॉफी जिंकत इतिहास रचला.
न्यूझीलंडचे माजी खेळाडू स्टिफन फ्लेमिंग यांना आयपीएलमधून निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर 2018 पासून ते चेन्नई सुपर किंग्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबादीर सांभाळत आहेत. त्याआधी 2016 मध्ये त्यांनी पुणे सुपरजायंट्सचं प्रशिक्षकपदही सांभाळलं होतं.
आयपीएलमध्ये पाचवेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या हेड कोचची जबाबदारी दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज खेळाडू मार्क बाऊचर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. विकेटकिपर आणि धडाकेबाज फलंदाज म्हणन त्यांची क्रिकेट कारकिर्द गाजली आहे. 2019 मध्ये त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली होती.