इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील अंतीम सामना येत्या रविवारी म्हणजे 28 मे रोजी खेळवला जाणार आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार असून यादिवशी भव्य समारोपाचा कार्यक्रम रंगणार आहे. बीसीसीआयने यासाठी काही कलाकारांची नावं फायनल केली आहेत.
गायक जोनिता गांधी, म्युझिक प्रोड्यूसर डीजे न्यूक्लिया, रॅपर किंग आणि प्रसिद्ध रॅपर डिवाइन समारोपाच्या कार्यक्रमात परफॉर्म करणार आहेत.
रॅपर किंग आणि डीजे न्यूक्लिया भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सहा वाजता म्हणजे सामन्याच्या आधी कार्यक्रम सादर करणार आहेत.
तर गायक जोनिता गांधी आणि डिवाइन यांचा सामन्याच्या मधल्या वेळेत धमाका असणार आहे. आयपीएलच्या ट्विटर हँडलवर याची माहिती देण्यात आली आहे.
किंग आणि न्यूक्लिया यांच्या पॉवरपॅक्ड इव्हनिंग परफॉर्मसाठी स्वत:ला तयार करा, या दोघांची अॅक्शन पाहण्यासाठी तुम्ही किती उत्साहित आहात असं या ट्विटमध्ये लिहिण्यात आलंय.
आयपीएल 2022 च्या समारोपात रणवीर सिंह आणि ए आर रहमानने शानदार कार्यक्रम सादर केला होता. यावेळी हे दोघं असणार की नाही याबाबत बीसीसीआयने स्पष्ट केलेलं नाही.
आयपीएल 2023 च्या उद्घाटन सोहळ्यात अरिजीत सिंह, तमन्ना भाटिया आणि रश्मिका मंदाना यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं.
रॅपर किंग हा एमटीव्ही 2019 च्या टॉप पाच स्पर्धकांपैकी एक आहे. तर जोनिता गांधी प्रसिद्ध गायिका आहे. तर डिवाइन प्रसिद्ध रॅपर असून बॉलिवूडचा 'गली बॉय' हा चित्रपट त्याच्या जीवनावर आधारित आहे.
आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा अंतिम सामना अहमदाबाच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवला जाणार असून संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल.