आजाराशी झुंज देत होता पाकिस्तानी क्रिकेटर, अनिल कुंबळेच्या एका सल्ल्याने बदललं आयुष्य, म्हणतो 'आज त्याच्यामुळेच...'

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू सकलैन मुश्ताकने कशाप्रकारे भारताचा दिग्गज खेळाडू अनिल कुंबळेने त्याची मदत केली याचा खुलासा केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 27, 2025, 07:13 PM IST
आजाराशी झुंज देत होता पाकिस्तानी क्रिकेटर, अनिल कुंबळेच्या एका सल्ल्याने बदललं आयुष्य, म्हणतो 'आज त्याच्यामुळेच...'

भारत आणि पाकिस्तानमधील शत्रुत्व आता जगजाहीर आहे. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद संपवत नाही किंवा दहशतवाद्यांना आश्रय देणं बंद करत नाही तोपर्यंत आम्ही सहकार्य करणार नाही अशी ठोस भूमिका भारताने घेतली आहे. याचा परिमाण मनोरंजन, क्रीडा यासह अनेक ठिकाणी दिसत आहे. यामुळेच एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असणारे हे दोन्ही देश क्रिकेटच्या मैदानात येतात तेव्हा संपूर्ण जगाचं याकडे लक्ष असतं. पण असं असलं तरी भारत-पाकिस्तान संघातील अनेक खेळाडूंनी मैत्रीपूर्ण संबंध जपले आहेत. शोएब अख्तर, वसीम अक्रम यांची अनेक भारतीय खेळाडूंशी आजही मैत्री आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटर सकलैन मुश्ताकने असाच एक किस्सा सांगितला आहे, ज्यावेळी अनिल कुंबळेने त्याची मदत केली होती. 

सकलैन मुश्ताकने सांगितलं की, "आम्ही इंग्लंडमध्ये होतो त्यावेळी अनिलभाईंना आमच्या देशात फार चांगले ऑप्टिशियन नाहीत असं सांगितलं. त्यामुळे मला थोडा संघर्ष करावा लागत आहे. तू मला काही चांगल्या नेत्ररोग तज्ज्ञांच नाव सुचवू शकतोस का? असं विचारलं. त्यावर त्याने मला डॉक्टर भरत रुगानी यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. मी आणि सौरव गांगुली त्यांच्याकडेच सल्ला घेत असल्याचं त्याने सांगितलं. त्याने मला डॉक्टरचा नंबर दिली. यानंतर मी हार्ले स्ट्रीट (लंडन) येथे त्यांना भेटायला गेलो".

मुश्ताकने पुढे सांगितलं की, "डॉक्टरांनी माझ्या डोळ्यांची तपासणी केली आणि मला लेंस दिले. मला मोतीबिंदू होता. माझे डोळेही अशक्त झाले होते. मी पाकिस्तानमध्ये अनेक डॉक्टरांकडून सल्ला घेतला होता. पण कोणीही माझ्यावर उपचार करु शकलं नाही. पण आता अनिलभाईमुळे माझे डोळे व्यवस्थित होण्यास मदत झाली. त्याच्यामुळेच मी आता ठीक झालो आहे".

अनिल कुंबळेने पाकिस्तानविरुद्ध 15 कसोटी सामन्यांमध्ये 81 विकेट्स घेतल्या होत्या. तसंच एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने पाकिस्तानविरोधा 34 एकदिवसीय सामन्यात 54 विकेट्स घेतल्या. 1999 मध्ये दिल्ली कसोटीत कुंबळेने पाकिस्तानविरुद्ध 10 विकेट्स घेतल्या होत्या. अनिल कुंबळेने 4 जानेवारी 2012 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.