भारतीय क्रिकेटर (Yuzvendra Chahal) आणि धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांनी अखेर घटस्फोट घेतला आहे. 19 फेब्रुवारीला वांद्रे कौटुंबिक न्यायालयात (Bandra Family Court) त्यांचा अधिकृतपणे घटस्फोट झाला. युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या नात्याची अत्यंत अनपेक्षितपणे सुरुवात झाली होती. कोविड लॉकडाऊनमध्ये विद्यार्थी आणि शिक्षिका असं त्यांचं नातं होतं. पण पुढील दोन महिन्यातच चहलचा तिच्यावर जीव जडला आणि नंतर प्रपोज केलं.
चहलने प्रपोज केल्यानंतर धनश्रीला आश्चर्याचा धक्का बसला होता. तिने आपली प्रतिक्रिया तसंच आईने काय म्हटलं होतं हे शेअर केलं होतं. 'झलक दिखला जा' च्या 11 व्या सीझनमध्ये धनश्री वर्माने सांगितलं होतं की, "लॉकडाऊनमध्ये कोणतेही सामने होत नव्हते. सर्व क्रिकेटर्स घरी बसून होते. त्यांची चिडचिड होत होती. त्यावेळी युझवेंद्रने अचानक एक दिवस डान्स शिकायचं ठरवलं. त्याने त्यावेळी सोशल मीडियावर माझे डान्स करतानाचे व्हिडीओ पाहिले होते. मी त्यावेळी डान्स शिकत होते. त्याने विद्यार्थी म्हणून माझ्याशी संपर्क साधला. मी त्याला शिकवण्यास तयार झाले. ते विद्यार्थी आणि शिक्षकाचं प्रोफेशनल नातं होतं, हे मला स्पष्ट करायचं आहे".
आपण त्याच्यासह दोन महिने ट्रेनिंग घेतली. यावेळी मी त्याला एक उत्तम डान्सर होण्यास मदत केली असंही तिने सांगितलं. पुढे ती म्हणाली की, "अचानक दोन महिन्यांनी त्याने मला लग्नासाठी मागणी घातली. तो बॅटिंग करत नाही, पण थेट षटकार मारला". आपल्याला यामुळे आश्चर्याचा धक्का बसला आणि थेट आईला सांगितल्याची आठवणही तिने सांगितली होती.
धनश्री म्हणाली की, "पहिली गोष्टी मी म्हटली ती म्हणजे 'गेला माझा विद्यार्थी'. मी नेहमीच एक प्रोफेशनल शिक्षिका होते". 2020 मध्ये धनश्री आणि युझवेंद्र चहलने हिंदू पद्धतीने विवाह केला.
19 फेब्रुवारीला वांद्रे कौटुंबिक न्यायालयात (Bandra Family Court) त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झालं. कोर्टात दोघांनीही आपला निर्णय सांगण्याआधी न्यायाधीशांनी 45 मिनिटं त्यांचं समुपदेशन केलं. कोर्टात दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी त्यांचा घटस्फोट झाल्याचं अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं. दोघांनी सुसंगतेची समस्या असल्याने विभक्त होत असल्याचं कोर्टाला सांगितलं आहे.
दरम्यान घटस्फोटानंतर धनश्री वर्माला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जात आहे. धनश्री वर्माने कथितपणे 60 कोटींची पोटगी घेतल्याचा दावा आहे. यावरुन नेटकरी संताप व्यक्त करत असून तिला खरीखोटी ऐकवत आहेत.