www.24taas.com, मुंबई
मतदानाच्या धावपळीत गेले १५ दिवस निवडणूक आयोगाला सहकार्य करणार्या शिक्षकांना आज मतदान केंद्रावर सकाळपासून दक्ष राहावं लागलं आहे. तेव्हा मतदान आणि १७ तारखेला होणाऱ्या मतमोजणीनंतर १८ फेब्रुवारीला सुट्टी देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्याकडे केली आहे.
निवडणूकीच्या कामासाठी शिक्षकांनाच राबवले जाते. मात्र शिक्षक नेहमीच विनातक्रार निवडणूक आयोगाचे काम करतात. १६ फेब्रुवारीला तर सकाळी ५ वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत शिक्षक निवडणुकीच्याच कामात राहणार आहेत. त्याचबरोबर १७ फेब्रुवारीला मतमोजणीसाठीही शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
त्यामुळे मतदानाची ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर १८ तारखेला पुन्हा शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना शिकवणे शिक्षकांना शक्या होणार नाही. त्यामुळे विश्रांतीसाठी शिक्षकांना निदान एका दिवसाची तरी सुट्टी मिळायला हवी अशी मागणी शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज.मो.अभ्यंकर, सरचिटणीस दिनेश गायकवाड यांनी केली आहे.