भारतीयानं शोधला मलेशियाच्या `त्या` विमानाचा ठावठिकाणा?
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
मलिशियाच्या बेपत्ता झालेल्या विमानाचा शोध गेल्या १२ दिवसांपासून सुरू आहे परंतु अद्याप या विमानाचा ठावठिकाणा लागलेला नाही. परंतु, याच दरम्यान एका भारतीय व्यक्तीनं या बेपत्ता विमानाचं लोकेशन शोधून काढण्याचा दावा केलाय.
अनूप माधव या हैदराबादच्या गाचीबोली इथल्या एका आयटी प्रोफेशनलनं हा दावा केलाय. ऑफिसमध्ये काम करताना सॅटेलाईट फोटोंच्या माध्यमातून आपल्याला `त्या` बेपत्ता झालेल्या विमानाचा ठावठिकाणा लागल्याचं अनूपनं म्हटलंय. या इंजिनिअरनं हा सॅटेलाईट फोटो वेबसाईटवरही अपलोड केलाय.
ज्या दिवशी हे विमान बेपत्ता झालं त्या दिवशी म्हणजेच ८ मार्च रोजीची एका मोठ्या एअरक्राफ्टची एक सॅटेलाईट इमेज अनूपला आढळलीय. हे एअरक्राफ्ट अंदमान बेटाजवळच अगदी कमी उंचीवरून उडताना आढळलं. अनुपच्या म्हणण्यानुसार, हेच ते मलेशिअन एअरलाईन्सचं बोईंग ७७७ विमान आहे, जे गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता आहे.
गेल्या ८ मार्च रोजी कुआलालंपूरहून बीजिंगसाठी रवाना झालेल्या आणि मध्येच बेपत्ता झालेल्या विमान एम एच ३७० च्या रहस्यानं सुरक्षा अधिकाऱ्यांसहीत अनेक देशांना चिंतेत टाकलंय. हायटेक रडार आणि अन्य सुविधा तैनात केल्यानंतरही या विमानाचा अजूनही पत्ता लागलेला नाही.
हे विमान शोधून काढण्याच्या अभियानात २६ देश सहभागी झालेत. चीननं शोध अभियानासाठी २१ उपग्रह तैनात केलेत. बेपत्ता झालेल्या या विमानात २३९ प्रवासी होते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
भारतीयानं शोधला मलेशियाच्या `त्या` विमानाचा ठावठिकाणा?
