अपहरण, धमकी अन् 68 लाख...; गुजरातचा व्यापारी मुंबईत किडनॅप, वाकोला पोलिसांनी लावला छडा, तिघांना ठोकल्या बेड्या

मुंबईतील वाकोला पोलिसांनी जबरदस्त कारवाई करत अपहरण झालेल्या गुजरातमधील कापड व्यापाऱ्याची सुटका केली आहे. वाकोल्यातून व्यापाऱ्याची सुटका करण्यात आली असून, तिघांना अटक करण्यात आली आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 27, 2025, 04:23 PM IST
अपहरण, धमकी अन् 68 लाख...; गुजरातचा व्यापारी मुंबईत किडनॅप, वाकोला पोलिसांनी लावला छडा, तिघांना ठोकल्या बेड्या

मुंबईतील वाकोला पोलिसांनी जबरदस्त कारवाई केली आहे. वाकोला पोलिसांनी अपहरण झालेल्या गुजरातमधील कापड व्यापाऱ्याची सुटका केली आहे. 60 वर्षीय केशवजी भीमाभाई चौधरी यांचं अपहरण करुन गोरेगावमधील एका फ्लॅटवर कोंडून ठेवण्यात आलं होतं. पोलिसांनी व्यापाऱ्याची सुटका केली असून, अपहरण करणाऱ्या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. तपासात खंडणीसाठी अपहर करण्यात आल्याचं उघड झालं आहे. आरोपींनी भीमाभाई चौधरी यांना मारहाणही केली होती. आर्थिक वादातून हा सगळा प्रकार घडला होता. 

42 वर्षीय महेशकुमार चौधरी यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पीडित केशवजी चौधरी हे त्यांचे वडील आहेत. महेशकुमार चौधरी हे मूळचे गुजरातच्या कच्छ येथील असून, सांताक्रूझ येथील वाकोल्यात वास्तव्यास आहेत. त्यांचा कपड्याचा व्यवसाय आहे. केशवजी चौधरी हे गुजरात येथून मुंबईत कपडे आणून त्यांयी विक्री करतात. मुंबईत आल्यानंतर ते मुलाकडे वास्तव्यास असतात. 20 फेब्रुवारीला केशवजी चौधरी मुंबईसाठी निघाले होते. पण घरी पोहोचलेच नाहीत. यानंतर त्यांनी शोध घेतला असता काही माहिती मिळाली नाही. 

महेशकुमार चौधरी यांना चार दिवसांनी वडिलांचं अपहरण केलं असून, 68 लाखांची खंडणी मागणारा फोन आला. जर पैसे दिले नाही तर वडिलांची हत्या करु अशी धमकी त्यांनी दिली. महेशकुमार चौधरी यांनी या सर्व प्रकारानंतर वाकोला पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत तात्काळ तपास सुरु केला. 

प्रकरण संवेदनशील असल्याने गंभीर दखल घेत चार पथकं गठीत करण्यात आली. तपासादरम्यान आरोपी सतत आपली जागा बदलत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. यानंतर कांदिवलीमधून राधेश्याम सोनी सतीश यादव आणि धर्मेंद्र रविदास या दोघांना अटक करण्यात आली. पोलिसांनी अटकेनंतर कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसंच केशवजी यांचं अपहरण करुन राममंदिर येथील एका इमारतीत ठेवल्याचं सांगितलं. यानंतर पोलिसांनी तात्काळ ठिकाण गाठलं आणि केशवजी यांची सुटका केली. राधेश्याम आणि केशवजी यांच्यात आर्थिक वाद असून त्यातूनच अपहरम झाल्याचं उघड झालं. 

अटकेनंतर पोलिसांनी आरोपींना कोर्टात हजर केलं असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.