पुनर्विकासातील घरावर पत्नीचा हक्क असतो का? SRA चा महत्त्वाचा निर्णय

Housing Latest Updates : जुनं घर पुनर्विकास प्रकल्पात जाऊन आता नवं घर मिळालंय? त्या घरावर पत्नीचा नेमका किती हक्क? पाहा महत्त्वाची बातमी...   

ब्युरो | Updated: Feb 25, 2025, 11:01 AM IST
पुनर्विकासातील घरावर पत्नीचा हक्क असतो का? SRA चा महत्त्वाचा निर्णय
Mumbai news wife even has right on a redeveloped house sra big decision made registration mandatory housing news

Housing Latest Updates : महिलांचे हक्क आणि महिलांच्या वाट्याला येणारे त्यांचे अधिकार यासह त्यांच्या जबाबजाऱ्या यासंदर्भात आजवर बरेच महत्त्वाचे मुद्दे प्रकाशात आणले गेले. त्याचदरम्यान घरावर पत्नीचा मालकी हक्क असतो का, यासंदर्भातील महत्त्वाची माहिती नुकतीच नव्यानं समोर आली आहे. जिथं पुनर्विकासाच्या घरावरील पत्नीच्या हक्कासंदर्भात सांगण्यात आलं. 

झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या महिलांच्या सबलीकरणासाठी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकारण अर्थात (एसआरए) च्या वतीनं अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पुनर्विकासानंतर मिळणारं घर हे पतीसह पत्नीच्या नावे करणं बंधनकारक करण्याचा निर्णय घेत एसआरएनं आता संयुक्त मालकीवर शिक्कामोर्तब केलं आहे. सदर निर्णयासंदर्भात परिपत्रक काढत 'झोपु' योजनेच्या अनुच्छेद 2 प्रमाणं मुंबई शहरातील हजारो झोपडपट्टीवासीयांसाठी पुनर्विकासाअंतर्गत हा निर्णय लागू केला आहे.

नव्या निर्णयानंतर नेमकं काय बदलणार? 

नव्या निर्देशांनंतर नव्या घराची नोंदणी करताना पती-पत्नीच्या नावाने संयुक्त नोंदणी करणं इथून पुढं बंधनकारक असेल. याव्यतिरिक्त सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक यांनीही पुनर्वसन योजनेंतर्गत येणाऱ्या गृहनिर्माणसंस्थांमध्ये पतीसह -पत्नीच्याही नावाची 'संयुक्त सदस्य' म्हणून नोंदव असावी. इतकंच नव्हे, तर शेअर प्रमाणपत्रे (Share Certificate) आणि सदस्यता दस्तऐवजांवरही संयुक्त मालकी दाखवणं बंधनकारक असेल. 

मुंबईत आतापर्यंत अनेक झोपडपट्टी परिसरांमध्ये पुनर्विकास प्रकल्प राबवण्यात आले असून, तेथील नागरिकांना इमारतींमध्ये घरं देण्यात आली. या प्रकल्पांसह आता भविष्यात आकारास येणाऱ्या प्रकल्पांमध्ये पतीप्रमाणंच घरावर पत्नीचीही मालकी असेल हेच स्पष्ट होत आहे. त्यामुळं येत्या काळात शहरातील पुनर्विकास प्रकल्पांच्या दृष्टीनं हा एक महत्त्वाचा निर्णय समजला जात आहे. 

नवी मुंबईत 300 एकरांची इनोव्हेशन सिटी 

इथं मुंबईत नव्या बांधकाम आणि पुनर्विकास प्रकल्पांच्या धर्तीवर महत्त्वाचे निर्णय घेतले जात असतानाच तिथं राज्याच्या आर्थिक विकासाला हातभार लावण्यासाठीसुद्धा काही पावलं उचलली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. नवी मुंबईतील 300 एकरांची 'इनोव्हेशन सिटी' हे त्याचच एक उदाहरण. 

हेसुद्धा वाचा : घर खरेदी करावं की भाड्यानं घ्यावं? कोणत्या पर्यायाने वाचेल तुमचा अधिक पैसा?

 

नवी मुंबईत एक नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारले जात असतानाच राज्य शासन या सुविधेजवळ एक पूर्णपणे नवं शहर विकसित करण्याचे उद्दिष्ट दृष्टीक्षेपात ठेवताना दिसत आहे. त्यासाठीचे आवश्यक करारही करण्यात आले असून, नवी मुंबईत येत्या काळात एक नवीन डेटा सेंटर पार्कही उभारलं जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. तेव्हा हा प्रकल्प प्रत्यक्षात नेमका कसा असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.