Mumbai Local Central Railway : मुंबईत दर दिवशी मोठ्या संख्येनं नागरिक रेल्वेनं प्रवास करतात. मुंबई लोकलच्या उपलब्धतेमुळं शहरातील बहुतांश भाग, उपनगरं जवळ आली असून मुख्य प्रवाहातील शहरांशी जोडली गेली आहेत. अतिशय दाटीवाटीच्या या शहरातून धावणाऱ्या रेल्वेचा हल्ली कोणत्याही वेळी गेलं तरीही तितकीच गर्दी पाहायला मिळते.
लोकलच्या याच गर्दीतून सर्वच श्रेणीतील प्रवासी प्रवास करतात. पण, काही प्रवासी मात्र गर्दीचाच फायदा घेत तिकीट न काढता, नियमांचं उल्लंघन करत फुकट प्रवास करतात. याच प्रवाशांना अद्दल घडवण्यासाठी म्हणून रेल्वेनं आता कठोर मोहिम हाती घेतली आहे. जिथं शहर आणि उपनगरांतील रेल्वे स्थानकांसमवेत रेल्वेमध्येसुद्धा टीसी किंवा (TTI) Travelling Ticket Inspector येऊन प्रवाशांच्या तिकीटाची विचारणा करत त्या तिकीटाची पुन:पडताळणी करत आहेत.
लाखोंच्या संख्येनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांमधून तिकीट न काढलेल्या प्रवाशांना हेरणं ही बाब तशी कठीणच. पण, रेल्वेनं नेमलेले हे कर्मचारी त्यांचं काम अगदी चोखपणे करत असून, त्यांच्या कामगिरीची मध्य रेल्वे विभागाकडूनही कौतूक होत आहे. (Central Railway) नं नुकत्याच केलेल्या एका X पोस्टमध्येही अशाच प्रसंगाची माहिती देत कर्मचाऱ्यांचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालं.
Record-breaking single-day performance in ticket checking!
Congrats to Rubina Akib Inamadar, (TTI) Travelling Ticket Inspector, Tejaswini 2 Batch, Mumbai Division!
Today, she detected a total of 150 irregular/without-ticket cases, generating ₹45,705 in ticket checking… pic.twitter.com/S9CL5GdLCv
— Central Railway (@Central_Railway) February 24, 2025
रेल्वेच्या या कौतुकास पात्र ठरल्या त्या म्हणजे टीटीआय पदावर सेवेत असणाऱ्या रुबिना अकिब इनामदार. तेजस्विनी 2 तुकडीतील या टीटीआयनं जवळपास 150 हून अधिक फुकटे प्रवासी पकडत त्यांच्याकडून तब्बल 45705 रुपयांची दंडस्वरुपातील रक्कम वसूल केली. यामध्ये 16430 रुपयांची रक्कम ही प्रथमश्रेणी बोगीतून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून वसूल करण्यात आली होती. एका दिवसात जवळपास एखाद्याचा महिन्याभराचा पगार असतो इतकी रक्कम वसूल करणाऱ्या या 'वसुली बाईं'चं सध्या सर्वच स्तरातूनही कौतूक होत आहे.