Marathi language Degree Course: आज मराठी भाषा दिन राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा होईल. सर्वत्र मराठीजन एकमेकांना शुभेच्छा देतील. मराठीचे गुणगान गायले जाईल. असे असताना मराठी भाषेसंदर्भात चिंताजनक बातमी समोर येतेय. मराठी भाषेत पदवी घेण्यासाठी विद्यार्थी उत्सूक नसल्याची आकडेवारी समोर आली आहे. काय आहे हे प्रकरण? सविस्तर समजून घेऊया.
मुंबई विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांत मराठी पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या समोर आली आहे. पण ही आकडेवारी पाहून मराठी माणूस म्हणून आपल्याला धक्का बसू शकतो आणि चिंताही वाटू शकते. मराठी भाषा पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश क्षमतेच्या निम्मेही विद्यार्थी मुंबईतील अनेक महाविद्यालयांना मिळाले नसल्याचे वास्तव समोर आले आहे.
सध्याच्या पिढीत महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओढा हा व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे आहे. या सर्वात भाषेकडे विद्यार्थी पाठ फिरवताना दिसत आहेत. मराठी भाषेला चांगले दिवस येण्यासाठी शासन स्तरावर विविध उपक्रम घेण्यात येतात. पण उच्च शिक्षणाचा पाया जिथे रचला जातो, अशा महाविद्यालयांमध्येच मराठीविषयी अनास्था दिसून येत आहे.
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मुंबई विद्यापीठाकडून विविध कार्यक्रम घेतले जातात. येथेच एम. ए. प्रथम वर्ष अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता 60 विद्यार्थी इतकी आहे. असे असताना केवळ 31 विद्यार्थ्यांनी घेतल्याची माहिती समोर आली आहे. एल्फिस्टन कॉलेजच्या बी. ए. प्रथम वर्ष,द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्षामध्ये अभ्यासक्रमासाठी एकूण 53 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. साठ्ये महाविद्यालयाच्या मराठी पदवीसाठी तृतीय वर्ष बीएला 34 विद्यार्थी शिकत आहेत. रुपारेल महाविद्यालयात विशेष प्राविण्याचा विषय म्हणून मराठी हा विषय 6 विद्यार्थ्यांनी घेतला आहे. तर द्वितीय वर्ष बी. ए मराठी अभ्यासक्रमाला एकूण 41 विद्यार्थी शिकत असल्याची माहिती समोर आली आहे. रामनारायण रुईया महाविद्यालयाच्या बी. ए. तृतीय वर्षाला 35 विद्यार्थी शिकत असल्याची माहिती समोर आली आहे.
बहुतांश विद्यार्थ्यांचा कल रोजगार देणाऱ्या अभ्यासक्रमांकडे वाढलेला दिसतोय. मराठी भाषेचा अभ्यासक्रम शिकून रोजगार मिळू शकतो, यावर विद्यार्थ्यांना विश्वास बसणे गरजेचे आहे. शासन स्तरावर तसे प्रयत्न होणे आवश्यक आहे. मराठी भाषेबाबत विद्यार्थ्यांच्या मनात आपुलकी निर्माण होणे गरज व्यक्त केली जात आहे.