'मालिकेचा शेवट...'; 'स्वराज्य रक्षक संभाजी'संदर्भात अमोल कोल्हेंचा खळबळजनक खुलासा

Amol Kolhe Shocking Claim About Swarajyarakshak Sambhaji TV Serial: सध्या 'छावा' चित्रपट चर्चेत असतानाच अभिनेते अमोल कोल्हेंनी आपल्या या मालिकेबद्दल धक्कादायक दावा केला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 25, 2025, 10:14 AM IST
'मालिकेचा शेवट...'; 'स्वराज्य रक्षक संभाजी'संदर्भात अमोल कोल्हेंचा खळबळजनक खुलासा
युट्यूबवर पोस्ट केला व्हिडीओ

Amol Kolhe Shocking Claim About Swarajyarakshak Sambhaji TV Serial: देशाबरोबरच जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये अभिनेता विकी कौशलने प्रमुख भूमिका साकारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या संघर्ष कथेवर आधारित 'छावा' चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम मोडले आहेत. या चित्रपटाची क्रेझ प्रदर्शनानंतर दहाव्या दिवशीही कायम आहे. असं असतानाच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार तसेच अभिनेते अमोल कोल्हेंनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी केलेल्या या खुलाश्यामुळे छत्रपती संभाजी राजेंच्या जीवनावर आधारित 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिका गुंडळण्यात आली का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

घरोघरात पोहोचलेली मालिका

अमोल कोल्हेंनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारलेल्या 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेबद्दल खळबळजनक दावा केला आहे. 24 डिसेंबर 2017 ते 29 फेब्रुवारी 2020 दरम्यान 'झी मराठी' वहिनीवर प्रदर्शित झालेली 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिका घराघरात पोहोचली. या मालिकेच्या माध्यमातून स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्रातील प्रत्येक माणसापर्यंत आणि महाराष्ट्रातील घराघरात छोट्या पडद्याच्या माध्यमातून पोहोचला. पण मात्र या मालिकेचा शेवटचा इतिहास दाखवण्यासंदर्भात अमोल कोल्हे आणि त्यांच्या संपूर्ण चमूवर कोणाचा दबाव तर नव्हता ना असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. खासदार अमोल कोल्हे यांनीच आता स्वत: या मालिकेसंदर्भात खळबळजनक खुलासा करताना मालिकेचा शेवट दाखवण्यासंदर्भात आपल्यावर दबाव होता असं म्हटलं आहे.

अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?

"हो माझ्यावरती आणि माझ्या टीम वरती दबाव होता. मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवावा यासाठी हा दबाव होता," असं मोठ विधान अमोल कोल्हे यांनी केलं आहे. 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेसंदर्भातील या खळबळजनक दाव्यासंदर्भातला टीझर त्यांनी आपल्या युट्यूब चॅनेलवरुन प्रसारित केला आहे. हा संपूर्ण प्रकार ते त्यांच्या अमोल ते अनमोल या यूट्यूब चॅनेलवर लवकरच प्रसारित करणार आहेत.

हे अन्याय करण्यासारखं

शरद पवारांच्या पक्षाचे नेते अंकुश काकडे यांनी खरंच अमोल कोल्हेंवर दबाव आणला असेल तर तो त्यांच्यावर अन्याय करण्यासारखं आहे. स्वत: अमोल कोल्हे हे सांगत असतील तर याबाबत इतर कोणाची साक्ष घेण्याची गरज नाही. नेमकं कोण त्यांच्यावर दबाव आणत असेल तर ते योग्य नाही. मग दबाव आणणारं कोणीही असेल अगदी राज्य सरकार असेल एखादी व्यक्ती असेल किंवा इतर कोणी असलं तरी हे योग्य नाही, असं काकडेंनी म्हटलं आहे.