जालन्यात IPS अधिकाऱ्याचा वाळू माफियांना दणका, परेड काढली अन् लिहून घेतला बाँड

जालना आणि भोकरदनमधील वाळू माफियांकडून पोलिसांनी बाँड लिहून घेतला असून पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलिसांनी वाळू माफियांची परेड काढलीय.

सोनेश्वर पाटील | Updated: Feb 27, 2025, 03:45 PM IST
जालन्यात IPS अधिकाऱ्याचा वाळू माफियांना दणका, परेड काढली अन् लिहून घेतला बाँड

Jalna : जालन्यात वाळू माफियांनी उच्छाद मांडलाय. काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील पासोडी गावाजवळ पुलांचं बांधकाम करणारे मजूर झोपेत असताना हायवा चालकानं त्यांच्या अंगावर वाळू टाकली. यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील मारहाण करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर आज पोलिसांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात वाळू माफियांची परेड घेतली. जालना जिल्ह्यातील जालना आणि भोकरदन परिसरामधील सुमारे 30 वाळू माफियांकडून पोलिसांनी 'बाँड' भरून घेतला आहे. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षकांनी वाळू माफियांना सज्जड दम देत अवैध वाळू चोरी, वाहतूक आणि वाळू उपसा तातडीने थांबवण्याच्या सूचना केल्या आहेत. 

जर पुन्हा अवैधरित्या वाळू उपसा आणि वाळू वाहतूक केल्यास तडीपार करण्यात येईल असा इशाराही पोलीस अधीक्षकांनी दिलाय. दरम्यान, जालना आणि भोकरदनमधील सुमारे 30 वाळू चोरी, वाहतूक असे गुन्हे असणाऱ्या आरोपींना अचानक पोलीस अधीक्षकांनी कार्यालयात बोलावून घेतले. यानंतर वाळू माफियांमध्ये एकच खळबळ उडाली. आतापर्यंत वाळू चोरी आणि वाहतूक करणाऱ्या 10 वाळू माफियांना जालना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलं आहे. त्यांच्यावर विविध कलमाद्वारे कारवाई देखील करण्यात आली आहे. याच अनुषंगाने जर पुन्हा वाळू माफियांनी अवैध वाळू चोरी किंवा वाहतूक केल्यास त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्याचा इशारा पोलिस अधीक्षकांनी दिला आहे. 

काही दिवसांपूर्वीच वाळू माफियांवर झाली होती कारवाई

काही दिवसांपूर्वीच जालन्यात वाळू माफियांवर मोठी कारवाई करण्यात आली होती. ज्यामध्ये अधिकाऱ्याने मठ पिंपळगाव येथे वाळू माफियांचे 2 जेसीबी त्यासोबत 5 हायवा जप्त केले होते. तसेच 2 कोटींपेक्षा अधिक रक्कमेचा माल ताब्यात घेतला होता. अधिकाऱ्याने केलेल्या या कारवाईनंतर अनेक वाळू माफियांचे धाबे दणाणले होते. ही घटना जालन्यातली अंबड तालुक्यात घडली होती. प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी सिद्धार्थ बारवाल यांचं कौतुक देखील केलं गेलं. त्यांना दुधना नदीच्या पात्रातून अवैध रित्या वाळू उपसा होत असल्याचे प्राथमिक माहिती मिळाली होती. त्यानंतर अधिकाऱ्याने वेशांतर करत दुधना नदी पात्र गाठले. त्यावेळी त्याठिकाणी अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याचं त्याच्या लक्षात येताच त्याने कारवाई केली.