Trimbakeshwar Temple Prajakta Mali: बुधवारी, 26 फेब्रुवारी रोजी असलेल्या 'महाशिवरात्री'निमित्त वेगवगेळ्या कार्यक्रमांची तयारी मागील काही दिवसांपासून सुरु आहे. महाशिवरात्रीला मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता राज्याबरोबरच देशातील अनेक मंदिर समितींनी वेगवेगळे निर्णय घेत भाविकांची गैरसोय होणार नाही आणि या महत्त्वाच्या दिवशी सर्व भक्तांना झटपट दर्शन घेता येईल अशी काळजी घेण्यात आली आहे. मंदिरांबरोबरच महाशिवरात्रीनिमित्त अनेक ठिकाणी संस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन केलं जातं. अशाच एका कार्यक्रमावरुन 12 ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये नवीन वादाला तोंड फुटलं आहे.
महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये संस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मात्र प्राजक्ता माळीच्या या कार्यक्रमाला आता विरोध होताना दिसत आहे. मंदिराच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी ग्रामीण पोलिसांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. यापूर्वी सेलिब्रिटी इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही, असं ललिता शिंदेंनी पत्रात म्हटलं आहे. तसेच या पत्रामध्ये ललिता यांनी प्राजक्ता माळी वादग्रस्त व्यक्तीमत्व असल्याने त्यांच्या नृत्याविष्कारा कार्यक्रमाला विरोध असल्याचंही म्हटलं आहे. या माध्यमातून चुकीचा पायंडा पाडू नये अशी ललिता शिंदे यांची मागणी असल्याचं पत्रातून स्पष्ट करण्यात आलं आहे. मंदिरातील धार्मिक वातावरण बिघडू नये अशी आमची इच्छा आहे, असंही ललिता यांनी म्हटलं आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिर विश्र्वस्तांच्या वतीने प्राजक्ता माळीच्या नृत्याविष्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. महाशिवरात्रीला संध्याकाळी मंदिराच्या प्रांगणात प्राजक्ता माळी यांचा 'शिवस्तुती नृत्याविष्कार' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आता त्याच्याविरोधात आवाज उठवण्यात आल्याने हा कार्यक्रम उद्या म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी होणार की तो विरोध गृहित धरता रद्द केला जाणार हे लवकरच स्पष्ट होईल.
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरुन भाष्य करताना भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना नाव घेतल्याने प्राजक्ता माळी चर्चेत आली होती. या प्रकरणावरुन राजकारण चांगलेच तापले होते. प्राजक्ताने पत्रकार परिषद घेत आपली भूमिका माध्यमांसमोर मांडली होती. प्राजक्ताने अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही भेट घेतली होती. अखेर सुरेश धस यांनी या प्रकरणामध्ये प्राजक्ता माळीची बिनशर्त माफी मागितली होती.