Pratap Sarnaik on Swargate Rape: पुण्यातील स्वारगेट बस डेपोच्या आवारात शिवशाही बसमध्ये 26 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार झाल्यानंतर आरोपीचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी आरोपीवर 1 लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे. आरोपी दत्ता गाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या गावी जाऊन लपल्याचं समजत आहे. पोलीस ड्रोनच्या आधारे त्याचा शोध घेत आहेत. यादरम्यान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक मोठं विधान केलं आहे. आरोपीला आधीपासूनच बसचा दरवाजा उघडा असल्याची कल्पना होती असं त्यांनी सांगितलं आहे.
"ती बस त्या ठिकाणी उभी केल्यानंतर आरोपी बोलत बोलत महिलेला तिथे घेऊन गेल्याचं सीसीटीव्ही दिसत आहे. तसंच बसचा दरवाजा उघडतो. याचा अर्थ त्याला बसचा दरवाजा उघडा आहे याची कल्पना होती. पोलीस तपासात ही बाब निदर्शनास येईल. त्यामुळे बसचा ड्रायव्हर, कंट्रोलर किंवा डेपो मॅनेजर असू द्या, जर ते दोषी आढळले तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल," असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे.
"आम्ही घेतलेल्या सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे निर्देश आजच्या बैठकीत देण्यात आले आहेत. अनेक बस डेपांमध्ये बसेस बंद पडलेल्या अवस्थेत आहेत. याशिवाय आरटीओच्या माध्यमातून काही चारचाकी वाहनंही उभी करण्यात आल्या आहेत. त्याचाही गैरफायदा काही समाजकंटक घेत असतात. त्यामुळे या सर्व बसेस आणि चारचाकी वाहनांना 15 एप्रिलपर्यंत भंगारमध्ये काढण्यासाठी वेळ दिला आहे," अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
"बस डेपोतील स्वच्छतेसाठी प्राधान्य देणार आहोत. आमच्याकडे 2700 च्या आसपास सुरक्षारक्षक आहेत. महाराष्ट्रातील बोर्डातील ज्या विविध सेवा आणि तीन एजन्सींच्या माध्यमातून त्यांना नियुक्त करण्यात आलं आहे. यामध्ये महिलांची संख्या कमी असून, ती 15 ते 20 टक्के असावी असा मतप्रवाह बैठकीत होता. तशी मागणी आम्ही सुरक्षा मंडळाला करणारा आहोत. राज्यातील एसटी महामंडळात जास्तील जास्त सुरक्षा देणं, अशा घटना घडू नये यासाठी काही उपायोजना आखता येतील का याची चर्चा केली," असंही त्यांनी सांगितलं.
एआय तंत्रज्ञानाचा वापर करत आम्ही नव्याने सुधारणा करणार आहोत असंही त्यांनी सांगितलं. तसंच सुरक्षेसाठी ऑडिट करण्याचा आदेशही दिला आहे असं त्यांनी म्हटलं. पुढे ते म्हणाले, ऑडिट केल्यानंतर त्रुटी निदर्शनास येतील. आरोपी पकडण्यात महत्त्वाची भूमिका सीसीटीव्ही निभावणार आहेत. स्वागेटमध्ये हे दिसलं आहे. जर एखाद्या डेपोत सीसीटीव्ही यंत्रणा कार्यन्वित नसेल तर त्यात सुधारणा केली जाईल".
"मी गुजरात, कर्नाटकमध्ये गेलो असता तिथे आयपीएस अधिकारी राज्य शासनाच्या माध्यमातून नियुक्त करण्यात आला आहे. आमच्याही विभागाला आयपीएस अधिकारी नेमावा अशी तरतूद आहे. आम्ही यासंदर्भात विनंती करणार आहोत," अशी माहिती त्यांनी दिली.