Alert : भयानक तापमान! मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये उष्णतेची लाट येणार

येत्या 24 तासात मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगडमध्ये उष्णतेची लाट येणार आहे. 

वनिता कांबळे | Updated: Feb 26, 2025, 08:06 PM IST
Alert : भयानक तापमान! मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये उष्णतेची लाट येणार

Heat Wave Alert In Mumbai : यंदा उन्हाळा सुरु होण्याआधीच भयानक तापमान पहायला मिळत आहे. पुढील 24 तासांत मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये उष्णतेची लाट येणार आहे. हवामान खात्याने हा इशारा दिला आहे. या दरम्यान तापमानाचा पारा 40 अंशापर्यंत जाईल असा अंदाजही वेध शाळाने वर्तवला आहे. यामुळे नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन देखील स्थानिक प्रशासनाकडुन करण्यात आले आहे. 

मागील आठवडा भरापासून संपूर्ण राज्यात उष्णतेचा पारा चांगलाच वाढला आहे. मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. सूर्य नारायण अक्षरश: आग ओकतोय.. कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे.असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुंबई शहर आणि उपनगरासह, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यत उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे.येत्या 24 तासात आकाश मुख्यतः निरभ्र राहील. 
कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 39°C आणि 22°C च्या आसपास असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यासह कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

उष्णतेपासून बचाव करा

वाढती उष्णता आणि बदलत्या हवामानामुळं ताप, डोकेदुखी, सर्दी, खोकला, अतिसार, डोळ्यांची जळजळ, अपचन यासारखा त्रास होवू शकतो. वाढत्या उष्म्याचा सामना करताना नागरिकांनी आजारपण टाळण्यासाठी काळजी घेणं गरजेचे आहे.उष्णतेम़ुळं शरीरातील पाणी कमी होवून अतिसार टाळण्यासाठी अधिकाधिक पाणी प्यावे, कडक उन्हामध्ये जास्त वेळ थांबू नये. सुती कपडे वापरावेत. अतिथंड पदार्थ आणि अति पेय घेणं टाळावे.  ताक, फळांचा रस घ्यावा. आंघोळीनंतर अंग कोरडे करून पावडर लावावी, शक्य झाल्यास दोनदा आंघोळ करावी.