Navi Mumbai Municipal School : नवी मुंबई महापालिकेच्या सहलीला गेलेल्या विद्यार्थ्याच्या मृत्यूनं अनेक प्रश्न निर्माण झालेत. महापालिका शाळेच्या एक हजार विद्यार्थ्यांना वॉटपार्कला सहलीसाठी नेण्यात आलं होतं. तिथं आयुष सिंह नावाच्या तेरा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय. आयुषला कोणताही त्रास नव्हता मग त्याचा मृत्यू झाला कसा असा प्रश्न आयुषच्या वडिलांना पडला आहे.
नवी मुंबई महापालिकेची सहल खालापूर येथील इमॅजिका येथे गेली होती. नवी मुंबई महापालिकेच्या हिंदी शाळेतील एका विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आयुष धर्मेंद्र सिंग (13) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. आयुष सिंग हा विद्यार्थी घणसोली येथे राहण्यास होता. तसेच तो नवी मुंबई महापालिकेच्या शाळा क्रमांक 76 मध्ये हिंदी माध्यमातून इयत्ता आठवी मध्ये शिकत होता.
मंगळवारी नवी मुंबई महापालिकेच्या शाळेतील आठवी नववीतील विद्यार्थ्यांची कर्जत येथील इमॅजिका येथे सहल नेण्यात आली होती. सर्व विद्यार्थ्यांनी इमॅजिकामध्ये दिवसभर सहलीचा आनंद घेतल्यानंतर सायंकाळी 5,30 बाजण्याच्या सुमारास आयुष हा इतर विद्यार्थ्यांसह चालत जात असताना त्याला अचानक आकडी आली आणि उलटी झाली त्यानंतर तो त्याच ठिकाणी कोसळला. यातच त्याचा मृत्यू झाला. याबाबत त्याच्या वडिलांना विचारले असता त्याला कुठला त्रास नसल्याचे सांगितले. सकाळी त्याला पिकनिकसाठी शाळेत सोडलं होत. शाळेचे माणसे घरी आल्यावर कळलं की असे झाले.खालापूर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
मंगळवारी खालापूर येथील इमॅजिका येथे सहलीसाठी महापालिकेच्या चार शाळांची 1018 विद्यार्थी आले होते. विशेष म्हणजे या सहलीसाठी पालिकेच्या शिक्षण विभागाने कोणतेही टेंडर काढले नव्हते. सहलीला घेऊन जाताना खाजगी अथवा मनपा शाळा यांच्यासाठी नियमावली असतात. या नियमावली नुसार पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना ऐतिहासिक विषयांचे ज्ञान मिळावे भौगोलिक सांस्कृतिक व शैक्षणिक गोष्टी प्रत्यक्ष पाहण्यास मिळाव्यात यासाठी एका वर्षात एका सहलीचे आयोजन करण्यास मान्यता आहे.
मात्र, इमॅजिका पार्क शासनाच्या कोणत्या नियमांमध्ये बसत नाही. राज्य शासनाच्या नियमांना बगल देऊन इमॅजिका पार्कला सहल का काढण्यात आली? असा सवाल मनसे नेते गजानन काळे यांनी उपस्थित केला. विशेष म्हणजे या सहलीची टेंडर प्रक्रिया झालेली नाही.10 विद्यार्थ्यांना मागे 1 शिक्षक असावा मग हजार विद्यार्थ्यांना घेऊन जाताना 100 शिक्षक होते का? 2 कोटी एवढा खर्च मनपाने या सहलीवर केला असल्याचा आरोप गजानन काळे यांनी केला आहे.