Shaktipeeth Expressway Kolhapur Farmers Oppose: महायुतीमधील घटकपक्षांचा महत्त्वकांशी प्रकल्प असलेल्या शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूरमध्ये मोठा विरोध होताना दिसत आहे. नागपूरवरुन गोव्याला जाणाऱ्या या प्रस्तावित मार्गासाठी जागा देण्यास कोल्हापूरकरांचा टोकाचा विरोध आहे. मागील अनेक महिन्यांपासून या विषयावरुन अनेकदा कोल्हापूरमध्ये आंदोलनं झाल्याचं पाहायला मिळालं आहे. असं असतानाच आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने म्हणजेच एमएसआरडीसीने या प्रकल्पासंदर्भात एका वेगळ्याच पर्यायाचा विचार सुरु केल्याचं सांगितलं जात आहे.
नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाचं कोल्हापूरमधील प्रस्तावित संरेखन वगळून हा महामार्ग कोकणात कसा नेता येईल यासाठी पर्यायी संरेखन करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच कोल्हापूरकरांचा विरोध पाहता हा मार्ग कोल्हापूरला वळसा घालून तयार करता येतो का याची चाचपणी सुरु झाली आहे. या नव्या योजनेनुसार सल्लागाराकडून पर्यायी संरेखनाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. शक्तिपीठ महामार्गाला असलेला विरोध मावळण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न सरकारी स्तरावर केले जात आहेत. ही नवीन कल्पना त्याचाच एक भाग आहे. अखेरपर्यंत कोल्हापूरकरांचा विरोध मावळला नाही तरच पर्यायी संरेखनानुसार महामार्ग कोकणात नेण्याचा अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी भूमिकाही एमएसआरडीसीने घेतल्याची माहिती आहे.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर 805 किलोमीटर लांबीचा नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग एमएसआरडीसीने प्रस्तावित केला आहे. या महामार्गाचे अंतिम संरेखन निश्चित झाले असून लवकरच भूसंपादनाच्या कामाला सुरुवात होणार आहे. मात्र या महामार्गाला कोल्हापूरसह अन्य काही भागातील शेतकरी, जमीन मालकांचा प्रचंड विरोध आहे. हा महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलनही करण्यात आले. मात्र राज्य सरकार आणि एमएसआरडीसी महामार्ग पूर्ण करण्यासाठी तडजोडीच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत.
कोल्हापूरप्रमाणे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही शक्तिपीठ महामार्गाला कडाडून विरोध केला आहे. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी परभणीतील शेतकऱ्यांनी केली आहे. पूर्णा तालुक्यातील संदलापूर, कातनेश्वर, पिंपळगाव बाळापूर, नावकी,अहेरवाडी, माटेगाव,सुरवाडी, जवळा खुर्द,उखळद,बाभळी, तीन धारवाडी गावच्या शेतकऱ्यांनी आंदोलन करत आपली मागणी मांडली. शक्तिपीठ महामार्गामुळे शेतकरी भूमिहीन होणार असून बाजार मूल्याच्या तुलनेत शेतीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आपली शेती शक्तिपीठ महामार्गाला द्यायला तयार नाहीत.
शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या 12 जिल्ह्यातील शेतकरी 12 मार्चला मुंबईतील आझाद मैदानवर धडकणार आहेत. कोल्हापुरात झालेल्या शक्तिपीठ विरोधी परिषदेमध्ये हा निर्णय झाला आहे. कोल्हापूरमध्ये आज बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शक्तिपीठ महामार्ग संदर्भात झाली परिषद झाली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलाय. या आंदोलनासंदर्भात काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी माहिती दिली आहे.