Pune Swargate Rape Case: आरोपी दत्तात्रय गाडेला पकडून देणाऱ्याला...; पोलिसांची मोठी घोषणा

Pune Swargate Rape Case: पुण्यातील स्वारगेट डेपोमध्ये उभ्या असलेल्या 'शिवशाही' बसमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी फरार आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 27, 2025, 10:28 AM IST
Pune Swargate Rape Case: आरोपी दत्तात्रय गाडेला पकडून देणाऱ्याला...; पोलिसांची मोठी घोषणा
पुणे पोलिसांची घोषणा

Pune Swargate Rape Case: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास एका 26 वर्षीय तरुणीवर डेपोमध्येच उभ्या असलेल्या 'शिवशाही' बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी समोर आली. या प्रकरणामध्ये तक्रार करुन दोन दिवस उलटून गेल्यानंतरही प्रमुख आरोपी दत्तात्रय गाडे फरार आहे. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांच्या सात तुकड्या तपास करत असतानाच पुणे पोलिसांनी मोठी घोषणा केली आहे. आरोपीला पकडून देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. 

पोलिसांनी केली बक्षिसाची घोषणा

पुणे पोलिसांच्या पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील यांनी 'एएनआय' या वृत्तसंस्थेशी बोलताना आरोपीला पकडून देणाऱ्याला बक्षीस देणार असल्याची घोषणा केली आहे. "जो पकडून देणार त्याला पोलीस 1 लाख रुपये दिले जातील. घटना समोर आल्यानंतर दिवसरात्र पोलीस तपास करत आहेत. मात्र आरोपीने मास्क घातलं होतं. त्यामुळे त्याचा चेहरा दिसत नव्हता. अखेर आमच्याच टीमने तपास करुन अर्धा, पाऊण तासामध्ये आरोपीची ओळख पटवली. पोलीस आता त्याचा शोध घेत असून तो लवकरच सापडेल. कारण तो असाच बस स्थानकांवर फिरताना दिसतो. तो लपत असेल म्हणूनच आता तो सापडत नाहीये. लवकरच तो सापडेल असा विश्वास आहे," असं स्मार्थना पाटील यांनी म्हटलं आहे.

सराईत आरोपी असल्याचे पुरावे

स्वारगेट बस स्थानकावरील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा सराईत आरोपी असल्याचे काही पुरावे पोलीस तपासादरम्यान समोर आले आहेत. काही राजकीय आणि पोलिसांच्या ही तो संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. एसटी स्थानकांवर रेंगाळत तेथील मुली, तरुणींना आपण पोलिस असल्याचे भासवून जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न त्याने यापूर्वी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

राजकीय व्यक्ती, पोलीस कर्मचारी संपर्कात

दत्तात्रय गाडे हा एका प्रमुख पक्षाच्या लोकप्रतिनिधीचा ‘कार्यकर्ता’ असल्याचेही समोर आले झाले असून, त्याच्या संपर्कात राजकीय व्यक्ती, पोलीस कर्मचारीही असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आलं आहे. त्याने स्वारगेट स्थानकामध्ये केलेल्या बलात्काराच्या घटनेव्यतिरिक्तही काही मुलींना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांना आहे. बस स्थानकावरील मुलींना आपण पोलिस असल्याचे भासवून घाबरवायचा. त्याच्या संपर्कात आलेल्या राजकीय व्यक्ती आणि पोलीस कर्मचाऱ्यांकडे चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

घरच्यांचीही झाली चौकशी

दत्तात्रय गाडेवर यापूर्वीही विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. दत्ता गाडेवर शिरूर, शिक्रापूर, अहिल्यानगर या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. ज्येष्ठ महिलांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुबाडण्याचे गुन्हे त्यावर दाखल आहेत. 2021 मध्ये कर्ज काढून घेतलेल्या एका चारचाकीने तो पुणे-अहिल्यानगर मार्गावर प्रवासी वाहतूक करत होता. यावेळी त्याने अनेक महिलांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटलं आहे. दत्ता गाडेच्या घरची परिस्थिती बेताची असून घरी आई-वडील, पत्नी, 2 मुले आणि एक भाऊ असा परिवार आहे. पुणे पोलिसांनी स्वारगेट प्रकरणात दत्तात्रय गाडेचा भाऊ, पत्नी आणि आई यांचा जबाब नोंदवला आहे.