Pune Swargate Rape Case: पुणे स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर बलात्काराच्या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय. याप्रकरणी आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणी संताप व्यक्त केलाय. पुण्याच्या हद्दीत जास्त अपहरणाच्या घटना घडतायत. महिलांवर खुलेपणाने अत्याचार, छेडछाडी घटना घडतायत. कोण आहेत पालकमंत्री, कोण आहेत पोलीस आयुक्त? यांना पोलिसांनी जाब विचारला पाहिजे. पुण्यात राजकीय गुंडगिरी सुरु आहे. सत्ताधारी पक्षातील गुंडांना खुलेपणाने अभय असल्याचे राऊत म्हणाले.
स्वारगेट बसमधील प्रकार हा दिल्लीच्या निर्भया घटनेप्रमाणे आहे. सुदैवाने या घटनेत तरुणीचा जीव वाचला. महिन्याला 1500 रुपये देऊन तुम्ही गुंडांना महिलांचे वस्त्रहरण करण्याचा परवाना दिला का?असा प्रश्न राऊतांनी विचारला. स्वारगेटला आमच्या शिवसैनिकांनी आंदोलन केले. ज्यात आमचे वसंत मोरे होते. पण यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. विरोधकांना त्रास देण्यासाठी गृहखातं वापरता. ते लाडक्या बहिणींच्या रक्षणासाठी वापरा, असे राऊत म्हणाले.
आमच्या काळात आम्ही शक्ती कायदा तयार केला. महिलांना संरक्षण मिळावं आणि त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी हा कायदा आहे. पण सरकार हा कायदा का करत नाही? शक्ती कायदा येऊ नये म्हणून फिक्सर आहेत का? शक्ती कायदा झाल्यास पूजा चव्हाण हत्येतील आरोपींपर्यंत पोहोचतील, म्हणून कायदा येत नाही का? असा प्रश्न त्यांनी विचारला.
अॅक्शन मोड हे वरवरची कारणे असतात. बलात्कार झाल्यावर अॅक्शन मोडमध्ये येता का? असा प्रश्न त्यांनी गृहमंत्र्यांना विचारला. एकही मंत्री सरकारी गाड्यांतून फिरत नाही. सगळ्यांकडे बीएमडब्ल्यू, मर्सिडीजमधून फिरतात. या गाड्या तुम्हाला कोणी दिल्या. सामान्य जनता एसटी, शिवशाहीतून फिरते. यांचे संरक्षण कोण करणार? असा प्रश्न त्यांनी विचारला.
मंत्रालयातील कारभारात मराठी अनिवार्य केली जाते. पण दुसरीकडे मराठी पदवीधरांना वेतनवाढ नाकारली जाते. अशावेळी बाळासाहेबांचे विचारवाहक आम्हीच आहोत, असे म्हणणाऱ्यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला.