Pune Swargate Rape Case: स्वारगेट बलात्कार प्रकरणात आत्तापर्यंत धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. फलटणला जाणाऱ्या 26 वर्षीय तरुणीवर स्वारगेट आगारात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला. आरोपीचे नाव दत्ता गाडे असून तो सध्या फरार आहे. पीडित तरुणीची वैदयकीय चाचणी करण्यात आली असून त्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
शिवशाही बलात्कार प्रकरणात पीडित तरुणीचा वैदयकीय तपासणी अहवाल पोलिसांनी सादर केला आहे. त्या अहवालानुसार, लैंगिक अत्याचार झाल्याचं वैद्यकीय अहवालातुन निष्पन्न झाले आहे. इतकंच नव्हे तर, आरोपीने पीडितेवर दोनदा लैंगिक अत्याचार केल्याचेही उघड झाले आहे. बुधवारी रात्री त्या तरुणीचे मेडिकल रिपोर्ट समोर आले आहेत. तसंच, ससून रुग्णालयातून तरुणीला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
26 वर्षांची तरुणी फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकात आली होती. त्यानंतर आरोपी तिथे आला आणि त्याने तरुणीसोबत बोलायला सुरुवात केली. तरुणीचा विश्वास संपादन केल्यानंतर आरोपीने तिला फलटणला जाणारी बस इथे लागत नाही तर दुसरीकडे लागते, असं सांगत तिला दुसऱ्या ठिकाणी नेले. तिथे उभ्या असलेल्या बसमध्ये तिला जायला सांगितले. जेव्हा तरुणीने प्रश्न उपस्थित केला तेव्हा त्याने म्हटलं की, ही रात्रीची बस आहे आतमध्ये प्रवासी झोपले आहेत. तु आज जावून बघ हवं तर, असा विश्वास तिला दिला.
तरुणी बसमध्ये गेल्यावर तो देखील तिच्या मागून बसमध्ये चढला आणि एसटीचा दरवाजा बंद केला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यानंतर तरुणीला धमकावत आरोपी तिथून निघून गेल्याचे समोर आले आहे. आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.
आरोपी दत्ता गाडे हा शिरूर तालुक्यातील गुणाट येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्यावर या अगोदरच जबरी चोरीचे गुन्हे हे शिरूर आणि शिक्रापूर पोलिस स्टेशन मध्ये असल्याने त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे समोर आले आहे.फरार दत्ता गाडे आरोपीचा शोध सध्या शिरूर आणि पुणे पोलिस करीत आहेत.
स्वारगेट बस स्थानकात ज्या शिवशाही बस मध्ये तरुणीवर अत्याचार झाला ती बस आता पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे. बसमधील पुरावे आणि हाताचे ठसे तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅब कडे बस नेण्यात आली आहे. काल रात्री ही बस घटनास्थळावरून हलवण्यात आली.