Swarget Rape Case: 26 वर्षीय तरुणीवर बलात्काराच्या घटनेनंतर पुण्याचा स्वारगेट बस स्थानक हादरला. मंगळवारी म्हणजेच 25 फेब्रुवारीला पहाटे शिवशाही बसमध्ये ही घटना घडली. या घटनेनंतर नराधम आरोपी फरार असून पोलिसांची 8 पथकं आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत. स्वारगेट आगाराच्या आवारात भंगार शिवशाही बसेस उभ्या आहेत. या बसेसमध्ये अनैतिक कामं सुरु असल्याचा आरोप होऊ लागलाय. या बसेसमध्ये कंडोम, साड्या, चादर, ब्लँकेट, अंतर्वस्त्र आणि दारुच्या बाटल्या आढळल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. दरम्यान 3 दिवस आधीच यासंदर्भात पुणे पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. काय म्हटलं होतं या तक्रारीत? पोलिसांनी याकडे वेळीच लक्ष दिलं असतं तर घटना टाळता आली असती का? सविस्तर जाणून घेऊया.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभाग स्वारगेट आगाराकडून पोलीस स्थानकात तक्रार देण्यात आली होती. 22 फेब्रुवारी रोजी ही लेखी तक्रार पुणे पोलिसांत देण्यात आली होती. यामध्ये खासगी एजंट आणि तृतीयपंथी आगारामध्ये येऊन प्रवाशी आणि कर्मचाऱ्यांना दमदाटी करतात, असे पहिले पत्र आहे. तर दुसऱ्या पत्रातून बस स्थानक परिसरात असलेल्या अवैध रिक्षा पार्किंगकडे लक्ष वेधण्यात आले होते.
स्वारगेट बस बलात्कार प्रकरणातआरोपीच्या शोधात पुणे पोलिसांचे 13 पथके रवाना करण्यात आले आहेत. त्यात विशेष शाखेचे 6 पथके आहेत. तर तरुणीवर अत्याचार करण्यात आलेली बस तपासणीसाठी नेण्यात आली आहे. बसमधील पुरावे आणि हाताचे ठसे फॉरेन्सिक तपासणीसाठी घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
स्वारगेट स्थानकात नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. येथे महाराष्ट्रभरातून प्रवासी येजा करत असतात. रोज 40 ते 45 हजार प्रवासी येथे येजा करत असतात. दरम्यान काही एजंट बस स्थानक परिसरामध्ये घुसतात आणि रांगेत असलेल्या प्रवाशांना ओढून घेऊन जातात. प्रवाशांना खासगी गाडीतून प्रवास करण्यासाठी उद्यूक्त करतात, असे एसटी आगाराने पुणे पोलिसांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय. यासंदर्भात याआधीदेखील सांगण्यात आलंय. पण कोणतीही कारवाई न झाल्याची खंत व्यक्त करण्यात आली. तसेच एसटी आगारात तृतीयपंथींची वर्दळ आणि दमदाटी वाढली आहे. ते मद्यपान करुन गलिच्छ आणि घाणेरडे पेहराव करुन आगारात वावरत असतात. यांच्याकडून वृद्ध, महिला, लहान मुलांना नाहक त्रास दिला जातो, त्यांच्याकडून जबरदस्ती पैसे घेत नाहक लूट केली जाते, असेही तक्रारीत म्हटले होते.
दुसऱ्या तक्रारीत अवैध पार्किंगचा प्रश्न निदर्शनास आणला गेला. स्वारगेट बस आगारात रोज 1700 बस येजा करतात. पण स्वारगेट स्थानकाच्या आत येण्याच्या आणि बाहेर जाण्याच्या मार्गावर अवैधरित्या रिक्षा पार्किंग केली जाते. हे रिक्षा चालक प्रवाशांसोबत उद्धट आणि उर्मटपणे वागतात. त्यांच्यामुळे विनाकारण वाहतूक कोंडी होते. त्यामुळे आगारात आणि बाहेर अपघाताचे प्रमाण वाढले असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. स्वारगेट पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरिक्षकांना हे पत्र लिहिण्यात आले आहे.