पुणे स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणात सर्वात मोठी कारवाई; एकाचवेळी 23 जणांची नोकरी गेली

पुण्यात स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाला आहे. या प्रकरणी 20 जणांचे निवंबन करण्यात आले आहे. 

वनिता कांबळे | Updated: Feb 26, 2025, 08:15 PM IST
पुणे स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणात सर्वात मोठी कारवाई; एकाचवेळी 23 जणांची नोकरी गेली

Pune Swargate Rape:  पुण्यात घडलेल्या बलात्काराच्या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला आहे. पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोत बलात्कराची घटना घडली आहे. एसटी महामंडळाच्या शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय प्रवासी महिलेवर बलात्कार झाला आहे. यामुळे महिलांच्या सुरक्षेबाबात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच या बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामुळे एकाचवेळी 23 जणांची नोकरी केली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही मोठी कारवाई केली आहे. 

स्वारगेट हे पुण्यातील सर्वात वर्दळीचे ठिकाण आहे. इथं नेहमीच मोठी गर्दी असते. अशातच स्वारगेट बस स्थानकात बलात्काराची घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.  पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोमधील सर्व सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्यात आलं आहे. डेपोतील शिवशाही बसमध्ये बलात्कार प्रकरणी डेपोमधील तब्बल 23 सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्यात आलं आहे. उद्यापासून नवीन सुरक्षा रक्षक कामावर रुजू करण्याचे आदेशही परिवहन मंत्र्यांनी दिले आहेत.  स्वारगेट डेपो मॅनेजर आणि वाहतूक नियंत्रक यांचे चौकशी करुन या प्रकरणात एक आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश परिवहन मंत्र्यांनी दिले आहेत. परिवहन आयुक्तांकडे हा अहवाल सादर केल्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय होणार आहे. 

शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी स्वारगेट बसस्थानकात जाऊन बसची पाहणी केली तसंच घटनेची माहिती घेतली. शिवशाही बसमध्ये पहाटे तरुणीवर बलात्कार झाला होता. याबाबत त्यांनी पोलीस आणि एसटी अधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या आहेत. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांची पुणे पोलीस आयुक्तांसोबत फोनवरून चर्चा केली.  तपास गंभीरपणे करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.  

दत्तात्रय गाडे असे आरोपीचे नाव आहे. आरोपी जामीनावर बाहेर होता.  पुण्यातील स्वारगेट स्थानकातून तरुणी फलटणला जाण्यासाठी निघाली होती. त्यावेळी नराधमानं तरुणीवर अत्याचार केलाय. आरोपीवर शिक्रापूर इथे गुन्हे दाखल करण्यात आला आहे.  तरुणीला फलटणला जाणारी बस आहे,  म्हणून दुसऱ्या बस मध्ये बसायला सांगण्यात आले होते. आता नराधमाच्या शोधासाठी आठ पथक तयार करण्यात आली आहेत.