Pune News Today: पुण्यातील स्वारगेट बस डेपोच्या आवारात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये 26 वर्षांच्या तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेतील आरोपी दत्ता गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आली असून पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे. तरुणीवर अत्याचार करण्यात आल्यानंतर आरोपी नेमकं कुठं गेला हे आता समोर आलं आहे.
मंगळवारी पहाटेच्या सुमारास तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पहाटे 5.30च्या सुमारास ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय. आरोपी मुळचा शिरूर तालुक्यातील रहिवाशी असून आरोपीचा सध्या पोलिसांकडून ड्रोनच्या साहाय्याने शोध घेतला जातोय. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी पुण्यात दुष्कृत्य करून आपल्या गावात परतला होता. संध्याकाळी पाचपर्यंत तो घरीच थांबला होता.
आरोपी पुण्यात दुष्कृत्य करून आपल्या गावात सकाळी 11 वाजता पोहचला होता. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्याने घरी विश्रांती घेऊन तो गावातच मुक्काम केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आरोपी शिरुरमध्येच शेतात लपला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. आरोपीच्या शोधासाठी विविध ठिकाणी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. आरोपीवरती पुणे अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक गुन्हे सुद्धा दाखल आहेत. आरोपी सध्या फरार झाला असून त्याचा पोलीस कसून तपास करत आहेत. पोलीस स्थानिकांची मदत घेत आहेत.
26 वर्षांची तरुणी फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकात आली होती. त्यानंतर आरोपी तिथे आला आणि त्याने तरुणीसोबत बोलायला सुरुवात केली. तरुणीचा विश्वास संपादन केल्यानंतर आरोपीने तिला फलटणला जाणारी बस इथे लागत नाही तर दुसरीकडे लागते, असं सांगत तिला दुसऱ्या ठिकाणी नेले. तिथे उभ्या असलेल्या बसमध्ये तिला जायला सांगितले. जेव्हा तरुणीने प्रश्न उपस्थित केला तेव्हा त्याने म्हटलं की, ही रात्रीची बस आहे आतमध्ये प्रवासी झोपले आहेत. तु आज जावून बघ हवं तर, असा विश्वास तिला दिला.
तरुणी बसमध्ये गेल्यावर तो देखील तिच्या मागून बसमध्ये चढला आणि एसटीचा दरवाजा बंद केला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यानंतर तरुणीला धमकावत आरोपी तिथून निघून गेल्याचे समोर आले आहे. आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.