What Does Swargate Means Know History: राज्य परिवहन महामंडळाच्या 'शिवशाही' बसमध्ये 25 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटे घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या धक्कादायक प्रकरणामुळे पुण्यातील स्वारगेट बस डेपो चर्चेत आहे. या प्रकरणामुळे एकच खळबळ माजली आहे. सदर प्रकरणामुळे पुण्यातील अगदी मध्यवर्ती भागात असलेल्या स्वारगेट बस डेपो नकोश्या कारणांमुळे चर्चेत असला तरी पुण्यात बाहेरुन येणाऱ्या अनेक एसटी याच बस डेपोत येत असल्याने पुण्याबाहेर लोकांनाही हा डेपो चांगलाच परिचयाचा आहे. मात्र अनेकांना स्वारगेट हे नाव नेमकं कसं आणि कशामुळे पडलं याची माहिती नाही. या नावा मागचा इतिहास फारच रंजक आहे.
खरं तर पुण्याला फार मोठा ऐतिहासिक वारसा आहे. आजही पुण्यात काही शे वर्षांहून अधिक काळापासूनच्या उभ्या असलेल्या इमारती या इतिहासाच्या साक्षीदार आहेत. हात इतिहास चाळताना 'स्वारगेट' नावामागील खरं लॉजिक काय आहे हे सापडतं. खरं तर या नावाबद्दल अनेक संदर्भ आणि दुवे साहित्यात सापडतात. मात्र सर्वात प्रचलित दाव्यानुसार 'स्वारगेट' हे नाव मराठी आणि इंग्रजी शब्दातून जन्माला आलं आहे. लेखक सुप्रसाद पुराणिक यांनी ‘नावामागे दडलंय काय?’ या पुस्तकात पुण्यातील विविध ठिकाणांच्या नावांचा रंजक इतिहास सांगण्यात आला आहे. या पुस्तकात पुराणिक यांनी 'स्वारगेट' नावाची गोष्टही सांगितली आहे.
पुण्यात प्रवेश करण्याचा एक मार्ग आताच्या 'स्वारगेट'वरून जात असे. पुण्याची वस्ती दिवसोंदिवस वाढत होती, शहराच्या आजूबाजूला असलेल्या पेठा (शनिवार पेठ वगैरे) वसत होत्या. पुण्यात नवीन रस्ते बनत होते. पूर्वी आतासारखा फार दूरपर्यंत न पसरलेल्या पुणे गावाबाहेर संरक्षणासाठी गस्त घातली जात असे. त्यासाठी पुण्याची जिथून सुरुवात होते असं मानलं जायचं त्या ठिकाणी कायम घोडेस्वार तैनात केलेले असायचे. अशा ठिकाणांना नाक्याचे ठिकाण किंवा पहारेकऱ्यांच्या चौक्या असं म्हटलं जायचं.
अशा या पुणे गावाच्या सीमेवरील सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या चौक्या इंग्रजांच्या काळातही तशाच राहिल्या. इंग्रजांनी कारभार हाती घेतल्यानंतर पारंपारिक कोतवाली बंद होऊन पोलीस खाते तयार करण्यात आलं. नाके किंवा चौकींऐवजी अशा सुरक्षेच्या दिशेने महत्त्वाच्या ठिकाणांची नावं ‘गेट’ अशी करण्यात आली. हे मुख्य गावाचं प्रवेशद्वार असल्याने तसेच सुरक्षा चौकी असल्याने या ठिकाणांना 'गेट' हे नाव देण्यात आलं. यामधूनच पुढे 'स्वारगेट' शब्दाचा जन्म झाला. ज्या ठिकाणी घोड्यांवर स्वार होण्यासाठी घोडेस्वार तैनात असायचे अशा नाक्याचे अथवा चौकीचे नाव पुढे मराठी आणि इंग्रजीचा एकत्र वापर करुन पुढे ‘स्वारगेट’ अशा नावाने ओळखले जाऊ लागले. हेच नाव अगदी आजही वापरलं जातं.