Sandhya Devnathan Success Story: सध्याच्या जगात सोशल मीडियावर नसतील अशी तरुणाई सापडणं फारच कमी आहे. आजकाल प्रत्येकाचे सोशल मीडियावर अकाऊंट असते. एकमेकांशी संपर्कात राहण्यासाठी, आपल्या चांगल्या-वाईट आठवणी शेअर करण्यासाठी फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मेटा ही या तिघांची पॅरेंट कंपनी आहे. मेटा ही जगातील मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक आहे. या कंपन्यांची इंडिया हेड असलेली व्यक्ती भारतीय असून तिचा दूरदूरपर्यंत सॉफ्टवेअर जगाशी संबंध नाही, हे तुम्हाला कोणी सांगितलं तर विश्वास बसेल का? हो. हे खरं आहे. या क्षेत्रातील डिग्री नसताना त्या मेटाच्या इंडिया हेड कशा बनल्या? सविस्तर जाणून घेऊया.
संध्या देवनाथन या सध्या मेटाच्या उपाध्यक्षा आणि मेटा इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक आहेत. नोव्हेंबर 2022 मध्ये त्यांना अजित मोहन यांच्या जागी मेटा इंडियाचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. यानंतर जानेवारी 2023 मध्ये त्यांनी पदभार स्वीकारला. त्यावेळी संध्या या मेटाच्या गेमिंग प्रोजेक्टचे नेतृत्व करत होती. संध्या यांनी आपल्या करिअरमध्ये मोठी झेप घेतली आहे. त्यामुळे लाखो तरुणांसाठी त्या प्रेरणास्त्रोत बनल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात आहे. त्यांनी शिक्षण आणि आत्मविश्वासाच्या जोरावर करिअरमध्ये उत्तूंग भरारी घेतली आहे.
संध्या देवनाथन 2016 मध्ये मेटा ग्रुपमध्ये सामील झाल्या. त्यांनी सिंगापूरमध्ये मेटामध्ये ग्रुप डायरेक्टर म्हणून नियुक्ती स्वीकारली होती. साऊथ इस्ट एशियन मार्केटमध्ये मेटाच्या ई-कॉमर्स, ट्रॅव्हल आणि आर्थिक सेवांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्यांनी सिंगापूर आणि व्हिएतनाममध्ये कंपनीचा व्यवसाय वाढवण्यास मदत केली. नंतर संध्या यांना सिंगापूरमध्ये व्यवस्थापकीय संचालक आणि व्हिएतनाममध्ये कंपनीची व्यवसाय प्रमुख बनवण्यात आले. यानंतर 2020 मध्ये त्या मेटाच्या आशिया-पॅसिफिक प्रदेशातील गेमिंग प्रोजेक्टचे नेतृत्व करण्यासाठी इंडोनेशियाला गेल्या.
संध्या देवनाथन यांच्या शिक्षणाविषयी फार कमी जणांना माहिती आहे. संध्या यांनी आंध्र प्रदेश विद्यापीठातून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये बीटेक केले. त्यांनी 1994 ते 1998 पर्यंत आंध्र प्रदेशमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर 1998 ते 2000 पर्यंत त्यांनी दिल्ली विद्यापीठातून एमबीए केले. 2014 मध्ये त्यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी बिझनेस स्कूलमधून लीडरशीपचा कोर्स केला. या कोर्समुळे त्यांच्या करिअरला कलाटणी मिळाली. त्यांचे व्यवस्थापन कौशल्य बळकट झाले. पुढे याच कौशल्यामुळे त्यांना विविध जबाबदाऱ्या मिळाल्या.
मेटामध्ये सामील होण्यापूर्वी संध्या यांनी साधारण 22 वर्षे वेगवेगळ्या क्षेत्रात काम केले. यात त्यांच्या करिअरला समृद्ध करणारा अनुभव मिळाला. त्यांनी बँकिंग, पेमेंट आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम केले. त्यांनी 2000 ते 2007 पर्यंत सिटीग्रुपमध्ये विविध पदांवर काम केले. त्यानंतर 2009 ते 2015 पर्यंत स्टँडर्ड चार्टर्डमध्ये काम केले.
संध्या यांना प्रॉडक्ट इनोवेशन आणि पार्टनरशिप बिल्डिंग क्षेत्रातील तज्ञ मानले जाते. मेटाच्या मुख्य व्यवसाय अधिकारी मार्ने लेव्हिन यांनी संध्या यांची इंडिया हेड म्हणून केली. नियुक्ती करताना दिलेल्या निवेदनातही त्यांनी संध्या यांच्या विविध गुणांचा उल्लेख केला होता.