Prajakta Mali Trimbakeshwar Temple Dance Controversy : महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरात अभिनेत्री प्राजक्ता माळीला नृत्य सादर करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं. पण काल प्राजक्तानं सोशल मीडियावर या संबंधीत माहित देत व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर हा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. हे पाहता आता प्राजक्ता माळीनं कार्यक्रमात नृत्य न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविषयी तिनं सांगितलं आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिर विश्र्वस्तांच्या वतीनं प्राजक्ता माळीच्या नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होते. आज म्हणजेच महाशिवरात्रीला संध्याकाळी मंदिराच्या प्रांगणात प्राजक्ताचा 'शिवस्तुती नृत्याविष्कार' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आता त्याच्याविरोधात आवाज उठवण्यात आल्याने हा विषय चर्चेत आला. तर त्यानंतर वाढता वाद पाहता प्राजक्तानं या कार्यक्रमात परफॉर्न न करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्राजक्ता माळीचा महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरात होणारा परफॉर्मन्स अखेर रद्द!#prajaktamali #Mahashivratri2025 #zee24taas pic.twitter.com/ujEJVHvIdX
— ZEE २४ तास (@zee24taasnews) February 26, 2025
व्हिडीओच्या सुरुवातीला प्राजक्तानं सगळ्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानंतर प्राजक्ता म्हणाली, 'आज महाशिवरात्री निमित्तानं त्र्यंबकेश्वर मंदिरातील कार्यक्रम शिवार्पणमस्तू. पहिल्यापासून या कार्यक्रमाला फार प्रसिद्धी द्यायची नाही हे ठरलं होतं. कारण मंदिराचं प्रांगण तिथलं क्षेत्रफळ, तिथे किती माणसं कार्यक्रम पाहण्यासाठी बसू शकतात, या सगळ्या गोष्टींचा विचार करता. मी देखील सोशल मीडियावर या कार्यक्रमाची अजिबातच माहिती दिली नव्हती, प्रसिद्धी दिली नव्हती. काल दिवसभरात या कार्यक्रमाला अनावश्यक प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे आता अवास्तव गर्दीची भीती, काळजी प्रशासनाच्या मनात आहे. त्यामुळे मी माझ्या कुटुंबाशी बोलून मी हा निर्णय घेतलाय की शब्द दिला आहे. कार्यक्रम होईल पण माझे सहकलाकार तो परफॉर्म करतील, सादर करतील ते हे माझ्याशिवाय.'
पुढे प्राजक्ता म्हणाली, 'अर्थातच यामुळे माझा आनंद कमी झाला आहे. पण वैयक्तिक सुखापेक्षा, आपल्यामुळे प्रशासनावर अतिरिक्त ताण येऊ नये, ही माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी वाटली. त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे. कोणाला वाईट वाटू नये किंवा कोणाच्याही मनात शंका उपस्थित होऊ नये म्हणून मी हा व्हिडीओ केला आहे.'
हेही वाचा : गर्दी, चेंगराचेंगरीचा विषय असेल तर..', त्र्यंबकेश्वर मंदिरातील नृत्य वादावर प्राजक्ता माळीने सोडलं मौन!
दरम्यान, या आधी प्राजक्ता माळीनं कालही एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओत तिनं म्हटलं होतं की गर्दी आणि चेंगराचेंगरीचा विषय असेल तर विश्वस्त आणि पोलीस जो निर्णय घेतील तो सामाजिक भान बाळगत सर्वांना बंधनकारक असेल आणि सर्वांना मान्य असेल. पण कार्यक्रमाचे स्वरुप हे शास्त्रीय नृत्य असेल.